परभणी आणि बीड घटनांवरून महाराष्ट्रभर संतापाची लाट; राज्यात सर्व जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चांचे वळण राजकीय समीकरणे बदलणार?
पुणे, ३१ डिसेंबर २०२४
माझा आवाज विशेष प्रतिनिधी
परभणी आणि बीड येथे घडलेल्या दुर्दैवी घटनांवरून संतापाची लाट महाराष्ट्रभर पसरली आहे. या घटनांच्या निषेधार्थ पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सर्वपक्षीय मोर्चे निघणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. या मोर्चांच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवर दबाव वाढत आहे, आणि महायुती सरकारमधील अंतर्गत तणाव उफाळून येण्याची शक्यता आहे.
विशेषतः, या घटनांमुळे धनंजय मुंडे यांचे राजकीय भवितव्य आणि महायुतीतील घटक पक्षांच्या भूमिका अधिक चर्चेत येऊ लागल्या आहेत. सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडानंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या परिस्थितीने सरकारच्या धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आगामी काही दिवसांत हे मोर्चे कोणते वळण घेतात आणि त्याचे राजकीय परिणाम कसे होतात, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. या घटनांवरून राज्यातील जनतेचा रोष आणि त्याचा सरकारवरील प्रभाव, पुढील राजकीय समीकरणांवर निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणि पवनचक्की प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचे नाव आले. विरोधकांनी साहजिकच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख असलेल्या अजित पवार यांच्याकडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री पद देऊ नये अशी सुद्धा मागणी विविध राजकीय पक्षाच्या आणि संघटनाच्या प्रमुखांनी केली आहे. केवळ विरोधकांनीच नाही तर महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजप आमदारांनी देखील धनंजय मुंडे यांच्या गुन्हेगारीने बरबटलेल्या राजकारणावर जोराची टीका करत असताना त्यांना मंत्रिपदावरून हटविण्याचा आग्रह धरला. गेल्या २० दिवसांपासून मराठवाड्यासह संपूर्ण राज्य बीड हत्याकांडातील आरोपींची अटक आणि देशमुख कुटुंबाच्या न्यायाकडे डोळे लावून बसलेला असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देण्यात टाळले आहे आणि मौनव्रत धारण केल आहे. त्यामुळे राष्ट्रवादीवर सुद्धा या सर्व प्रकरणाचा खूप मोठा दबाव असण्याची शक्यता निर्माण झाली असून सत्तेतील असलेल्या या तीन पक्षात अंतर्गत सुप्त संघर्ष वाढण्याची आणि त्याचा एकूणच सरकारवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गोष्टीने सरकार लगेच अस्थिर होणार अशी शक्यता कमी असली तरी सरकारच्या कार्यक्षमतेवर मात्र त्याचा नक्कीच परिणाम होणार आहे. त्यामुळे अजितदादांनी धनंजय मुंडे गोत्यात आल्याने त्यांच्या डोक्यावरील आशीर्वादाचा हात काढला आहे की काय? अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
असेच ताजे अपडेट्स आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी ‘माझा आवाज’ या बातमी पोर्टलला आणि आमच्या इतर सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा.









