‘त्या’ विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाका : आमदार रोहित पाटील
हजारो शेतकऱ्यांच्या फसवणुकीला वाचा फोडत आक्रमक मागणी
मुंबई: माझा आवाज वृत्तसेवा
दि.१८ डिसेंबर २०२४: राज्यातील पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे हजारो शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. विम्याची रक्कम वेळेत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. पुण्यातील कार्यालयात बसून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या अधिकाऱ्यांची रवानगी तात्काळ येरवडा जेलमध्ये करा, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केली.
राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना पाटील यांनी कृषी क्षेत्रातील विसंगतींवर भाष्य केले. “राज्याला कृषी प्रोत्साहनासाठी मोठ्या घोषणा दिल्या जात आहेत, पण प्रत्यक्षात फक्त दिवास्वप्नं दाखवली जात आहेत,” असे ते म्हणाले.
द्राक्ष उत्पादकांसाठी विशेष भरपाईची मागणी
तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात द्राक्ष उत्पादन हे मुख्य अर्थकारण आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे ११ हजाराहून अधिक पंचनामे झाले असून, ४८०० हेक्टर द्राक्ष शेती बाधित झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांना एक रुपयाही नुकसान भरपाई मिळालेली नाही. “द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना खर्चाएवढी नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी,” अशी ठाम मागणी पाटील यांनी केली.
कृषी धोरणे आणि जीएसटीचा फटका
शेतकऱ्यांच्या अडचणींवर लक्ष केंद्रित करताना पाटील म्हणाले, “खतांवर १८% जीएसटी हा शेतकऱ्यांच्या डोक्यावरती लादलेला बोजा आहे. शिवाय, बेदाणा साठवण्यासाठी शीतगृहात ठेवताना देखील जीएसटी भरावा लागतो, हे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीचे कारण आहे.”
आमदार रोहित आर आर पाटील यांच्या या आक्रमक भाषणामुळे शेतकऱ्यांच्या समस्या राज्यभर चर्चेचा विषय बनल्या आहेत. आता सरकारकडून कोणती ठोस पावले उचलली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या आणि अशा अनेक बातम्या आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या “माझा आवाज” या न्यूज पोर्टलला आणि “माझा आवाज “च्या इतर सोशल मीडिया हँडल्स ना फॉलो करा









