भाजपची मोठी कारवाई: शरद पवार यांच्यासाठी काम केल्याचा ठपका, भाजप आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस
माझा आवाज विशेष प्रतिनिधी
मुंबई: दि. १७ डिसेंबर २०२४ – महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षातील आमदार रणजीतसिंह पाटील यांना “कारणे दाखवा नोटीस” पाठवून मोठी कारवाई केली आहे. शिस्तभंगाचे कारण पुढे करत, रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या बाजूने भूमिका घेतल्याचा ठपका पक्षाने ठेवला आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकी मध्ये झालेल्या चुकांची दुरुस्ती करताना दिसत आहेत यातून ते २०२९ च्या निवडणुकांसाठी आणि शत प्रतिशत भाजप सरकार होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत आताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तसेच पाठीमागील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे काही आमदार शरद पवार यांच्यासोबत स्नेह ठेवत असल्याची चर्चा सुरू होती. रणजीतसिंह पाटील हेही या चर्चेच्या केंद्रस्थानी होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी जवळीक आणि त्यांना गुप्तपणे सहकार्य केल्याचा आरोप पाटील यांच्यावर आहे.
शरद पवार यांचे राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय वर्चस्व अजूनही कायम आहे, हे पाहता काही भाजप आमदार पवार यांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा संशय भाजपच्या नेतृत्वाला आला होता. या पार्श्वभूमीवर भाजपने कठोर पाऊल उचलत, पक्षाची निष्ठा आणि शिस्त याविषयी इशारा देण्यासाठी रणजीतसिंह मोहिते पाटील यांना नोटीस बजावली आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ
भाजपच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना आपल्याभोवती एकत्र करण्याची खेळी सुरू केली होती तर आता दुसरीकडे भाजप आपल्या आमदारांना शिस्तबद्ध ठेवण्यासाठी सज्ज दिसत आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, भाजपमध्ये अशी अंतर्गत बंडखोरी थांबवण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली असून, पक्षातील प्रत्येक आमदाराला स्पष्ट संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या(महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती) निवडणुकांमध्ये कुठल्याही प्रकारच्या असंतोषाला वाव द्यायचा नसल्याचं या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.

रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी यावर कसा प्रतिसाद देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षाने त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ठरावीक कालावधीत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. जर स्पष्टीकरण समाधानकारक नसेल, तर भाजपकडून पुढील कडक कारवाई होऊ शकते.
यासारख्या ताज्या बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या “माझा आवाज” या न्यूज पोर्टलला आणि इतर सोशल मीडिया हँडलला फॉलो करा.









