वायफळे खून प्रकरण: ४२ तासांनी रोहितवर अंत्यसंस्कार
सराईत गुन्हेगारांच्या हस्तकांडामुळे गावात तणाव; पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी पूर्ण
माझा आवाज प्रतिनिधी | तासगाव
तासगाव तालुक्यातील वायफळे गावात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या निघृण खून प्रकरणाने संपूर्ण गाव हादरले आहे. रोहित संजय फाळके याचा धारधार शस्त्रांनी हल्ला करून जीव घेण्यात आला. याप्रकरणी मुख्य आरोपी विशाल फाळके याच्यासह त्याच्या टोळक्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल फाळके हा मोक्का अंतर्गत गुन्हेगार असून, या घटनेने गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
खून झाल्यानंतर मृत रोहितच्या कुटुंबीयांनी आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यांच्या या निर्णयामुळे गावात तणाव वाढला होता. अखेर गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) पुण्यात सापळा रचून विशाल फाळकेला जेरबंद केले. आरोपीला अटक झाल्यानंतरच, पोलीस बंदोबस्तात, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुटुंबांतील जुना वाद: खुनाला कारणीभूत
गेल्या अनेक वर्षांपासून वायफळे येथील संजय फाळके व विशाल फाळके यांच्या कुटुंबांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद सुरू आहेत. याच वादातून अनेकदा हाणामाऱ्या झाल्या असून, दोन्ही कुटुंबांतील सदस्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. गुरुवारी संध्याकाळी जुन्या वादाचा राग मनात ठेवून विशालने आपल्या टोळक्यासह वायफळे बसस्थानकाजवळ रोहित व त्याच्या नातेवाईकांवर तलवार आणि कोयत्याने हल्ला केला.
हल्ल्याचा सविस्तर आढावा
विशाल फाळकेने पुण्यातून सराईत गुन्हेगारांची टोळी बोलावून आणली होती. हल्ल्यावेळी टोळक्याने उघडपणे तलवारी नाचवत परिसरात दहशत निर्माण केली. या हल्ल्यात रोहित फाळके, आदित्य साठे व आशीष साठे, तसेच सिकंदर शिकलगार हे गंभीर जखमी झाले. स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी रोहितने घराकडे धाव घेतली, मात्र आरोपींनी पाठलाग करत त्याच्यावर घरासमोरच वार केले. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील संजय व आई जयश्री धावून आले, मात्र आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला केला.
पोलिसांची तातडीने कारवाई; आरोपीचा शोध
खुनानंतर आरोपी विशाल फाळके व त्याची टोळी फरार झाली होती. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखा आणि तासगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली. पुणे येथे आरोपी असल्याची माहिती मिळाल्यानंतर, २४ तासांत आरोपी विशाल फाळकेला अटक करण्यात आली.
आरोपी १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत
विशाल फाळके याला तासगाव न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशालच्या टोळीत सहभागी इतर गुन्हेगारांची ओळख पटली असून, ते सध्या फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू आहे.
विशाल फाळके याचा सराईत गुन्हेगारीचा मोठा इतिहास
विशाल फाळके हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी पुणे जिल्ह्यात खंडणी, जबरी मारामारी व खुनाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०१४ मध्ये पुण्यातील खंडणी प्रकरणात त्याच्या गुन्हेगारी प्रवासाची सुरुवात झाली होती. तो मोक्का अंतर्गत गुन्हेगार असून, त्याचा परिसरात मोठा दहशतीचा इतिहास आहे.
गावात पोलीस बंदोबस्त तैनात – तणावपूर्ण शांतता
रोहितच्या अंत्यसंस्कारानंतरही वायफळे गावात तणावपूर्ण शांतता आहे. गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले आहे.
या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संताप आहे. सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. गावात अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या खून प्रकरणाने गावात तणावाचे वातावरण आहे. आरोपींना कठोर शिक्षा होऊन कुटुंबाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
माझा आवाज प्रतिनिधी तासगाव
– आपल्या भागातील ताज्या बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा आवाज या न्यूज पोर्टल आणि व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा.









