Home » माझे शहर » खारघर प्रदूषणाच्या विळख्यात! नागरिक त्रस्त, प्रशासन निष्क्रिय

खारघर प्रदूषणाच्या विळख्यात! नागरिक त्रस्त, प्रशासन निष्क्रिय

Facebook
X
WhatsApp
Telegram

खारघर प्रदूषणाच्या विळख्यात! नागरिक त्रस्त, प्रशासन निष्क्रिय

माझा आवाज प्रतिनिधी: खारघर 

खारघर शहरातील आणि परिसरातील नागरिक सध्या वाढत्या प्रदूषणामुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आणि दम्याच्या रुग्णांना वायू आणि ध्वनी प्रदूषणामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

बांधकाम व्यवसाय नियमांचं उल्लंघन
खारघरमधील सर्व सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकाम चालू आहे. परंतु, या बांधकाम व्यवसायिकांनी महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. धुळीकण, विषारी वायू, आणि ध्वनी प्रदूषणामुळे हवेचा दर्जा खालावत चालला आहे. नियमांनुसार 18 मीटर उंच हिरव्या जाळीने बांधकाम स्थळे झाकणे आणि हवेत उडणाऱ्या धुळीच्या कणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाण्याचे तुषार मारणे आवश्यक आहे. मात्र, हे नियम सर्रास पायदळी तुडवले जात आहेत, आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कुठलीही कारवाई होताना दिसत नाही.

महापालिका निष्क्रिय, नागरिक संतप्त
नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. “महापालिकेचे अधिकारी फक्त एअर कंडिशन दालनांमध्ये बसून राहतात, आणि त्यांना बांधकाम व्यावसायिकांकडून मोबदला मिळाल्यामुळे ते कारवाई करत नाहीत,” असा आरोप अनेक रहिवाशांनी केला आहे. बांधकाम ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याची जबाबदारी पार पाडण्यातही हे अधिकारी अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरोग्याला धोका वाढतोय
बांधकामांमुळे उडणाऱ्या धुळीकणांमुळे अनेक रहिवाशांना खोकला, सर्दी, घसादुखी, आणि श्वसनाचे आजार होऊ लागले आहेत. “हा प्रश्न आता गंभीर आरोग्य संकटात रूपांतरित होत आहे,” असे मत स्थानिक डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

रहिवाशांची आंदोलनाची चेतावणी
खारघर आणि परिसरातील नागरिकांनी बांधकाम व्यावसायिकांवर तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. “जर प्रशासनाने योग्य पावले उचलली नाहीत, तर आम्ही संविधानाने दिलेल्या मार्गाने आंदोलन करू,” अशी ठाम भूमिका माजी नगरसेविका सौ. नेत्रा किरण पाटील यांनी घेतली आहे. या संदर्भात पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश शेटे यांना निवेदनही सादर करण्यात आले आहे.

महापालिकेच्या तातडीच्या कृतीची गरज
खारघरमधील वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा दुर्लक्षित राहणे हे सर्वसामान्य जनतेच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करणारे आहे. पनवेल महानगरपालिकेने तत्काळ कारवाई करून बांधकाम नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

– ‘माझा आवाज’ विशेष प्रतिनिधी

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!