वायफळे येथील खून प्रकरण – मुख्य आरोपी विशाल फाळकेला पोलिसांकडून अटक
पुण्यात एलसीबीची कारवाई – 24 तासांत आरोपीला केली जेरबंद
तासगाव : माझा आवाज वृत्तसेवा
वायफळे (ता. तासगाव) येथील रोहित संजय फाळके खून प्रकरणात मुख्य आरोपी विशाल फाळकेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुण्यात अटक केली. खुनानंतर अवघ्या 24 तासांत आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले.
किरकोळ वादातून उफाळलेला संघर्ष – वायफळे येथील संजय फाळके व विशाल फाळके यांच्या कुटुंबीयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. किरकोळ कारणांवरून वाढत गेलेल्या या वादाने हिंसक वळण घेतले. दोन्ही कुटुंबांवर यापूर्वीही गुन्हे दाखल झाले होते. गावपातळीवर वाद मिटवण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने वातावरण तापलेले होते.
खुनी हल्ल्याची घटना
गुरुवारी सायंकाळी विशाल फाळके आपल्या साथीदारांसह वायफळे बसस्थानकाजवळ पोहोचला. यावेळी त्याने रोहित फाळके आणि त्याचे नातेवाईक आदित्य व आशिष साठे यांच्यावर तलवारीने हल्ला चढवला. रोहित घराकडे पळून जाण्यात यशस्वी झाला, मात्र आदित्य व आशिष गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांनी सिकंदर शिकलगार या ग्रामस्थावरही विनाकारण हल्ला केला.
रोहितला घरात पाठलाग करून विशाल फाळके व त्याच्या टोळीने धारधार शस्त्रांनी गंभीर जखमी केले. वडील संजय आणि आई जयश्री यांनी रोहितला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपींनी त्यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला.
रोहितचा मृत्यू; अन्य जखमींवर उपचार सुरू
जखमींना भिवघाट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रोहित फाळकेचा मृत्यू झाला. जयश्री फाळके यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पोलिसांची जलद कारवाई – 24 तासांत आरोपी अटकेत
खुनाच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली त्वरित पथकांची नियुक्ती करण्यात आली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पुण्यात भारती विद्यापीठ परिसरात आरोपी विशाल फाळकेला अटक करण्यात आली.
विशाल फाळके हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर तासगाव, पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सतर्कतेमुळे या प्रकरणातील मुख्य आरोपीला जेरबंद करण्यात आले.
– माझा आवाज वर वाचा अधिक ताज्या घडामोडी आणि बातम्या!_









