Home » Uncategorized » आमदार रोहित दादांचा मदतीचा हात: एका फोनने गरीब कुटुंबाला मिळाला जीवदान! पुण्यातील नामांकित हॉस्पिटलने माफ केले लाखोंचे बिल!

आमदार रोहित दादांचा मदतीचा हात: एका फोनने गरीब कुटुंबाला मिळाला जीवदान! पुण्यातील नामांकित हॉस्पिटलने माफ केले लाखोंचे बिल!

Facebook
X
WhatsApp
Telegram
Oplus_16908288

आमदार रोहित दादांचा मदतीचा हात: एका फोनने गरीब कुटुंबाला मिळाला जीवदान! पुण्यात हॉस्पिटलने माफ केले लाखोंचे बिल!

माझा आवाज विशेष प्रतिनिधी पुणे

पुणे: दि.  १७ मे २०२५:राजकारणात समाजसेवेचा वसा जपणारे युवा नेते, आमदार रोहित (दादा) आर आर पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेची आणि तत्परतेची प्रचिती दिली आहे. त्यांच्या एका फोनमुळे पुण्यातील एका अत्यंत प्रतिष्ठित आणि नामांकित हॉस्पिटलने एका गरीब व गरजू रुग्णाचे तब्बल पाच लाख ऐंशी हजार रुपयांचे मोठे बिल माफ केले आहे. हणमंत पाटील यांनी सोशल मीडियावर या हृदयस्पर्शी घटनेची माहिती दिल्यानंतर सर्वत्र रोहित दादांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

या घटनेची सुरुवात हणमंत पाटील यांच्या ऑफिसमधील एका नेहमीच्या दिवसाप्रमाणे झाली. काम करत असताना त्यांचे बालमित्र दीपकराव चव्हाण (कुंडलापूर) यांचा त्यांना अचानक फोन आला. दीपकरावांनी सांगितले की त्यांचे जवळचे मित्र शुभम खोत (कवठेमहांकाळ) यांचे मामा पुण्यातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत आणि त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या शरीरात कोणतीही सुधारणा दिसत नव्हती, त्यामुळे डॉक्टरांनीही उपचारांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले होते. यामुळे खचलेल्या कुटुंबीयांनी शेवटी त्यांना घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला होता.

परंतु, या परिस्थितीत एक मोठी अडचण उभी राहिली. हॉस्पिटल प्रशासनाने आतापर्यंतच्या उपचारांचे तब्बल पाच लाख ऐंशी हजार रुपयांचे बिल भरल्याशिवाय रुग्णाला डिस्चार्ज देण्यास स्पष्ट नकार दिला होता. आपल्या मित्राच्या मामांच्या अडचणीत असलेल्या कुटुंबाची माहिती मिळताच हणमंत पाटील यांनी तातडीने हॉस्पिटलला धाव घेतली. त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णाची प्रत्यक्ष भेट घेतली. अतिदक्षता विभागात (ICU) दाखल असलेल्या रुग्णाची गंभीर अवस्था पाहून त्यांचे मन हेलावून गेले.

त्यानंतर पाटील यांनी रुग्णाच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात उपचारांवर जवळपास अकरा ते बारा लाख रुपये खर्च झाले आहेत. आता आणखी सात ते दहा लाख रुपये भरले तरी डॉक्टर काही खात्री देत नाहीत आणि रुग्णाच्या शरीरात कोणतीही हालचाल दिसत नसल्याने त्यांनी डिस्चार्ज घेऊन त्यांना कोल्हापूरमधील दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याची तयारी केली आहे. मात्र, आर्थिक अडचणींमुळे आणि हॉस्पिटलच्या भूमिकेमुळे ते पूर्णपणे हतबल झाले होते.

अखेरीस, हणमंत पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि त्यांनी थेट आमदार रोहित (दादा) आर आर पाटील यांना फोन करून या बिकट परिस्थितीची माहिती दिली. रोहित दादांनी क्षणाचाही विलंब न लावता पुण्यातील एका नामांकित आणि निष्णात डॉक्टरचा संपर्क क्रमांक पाटील यांना दिला. केवळ क्रमांक देऊनच ते थांबले नाहीत, तर त्यांनी स्वतः देखील त्या डॉक्टरांना तातडीने फोन करून या गरीब रुग्णाला सर्वतोपरी मदत करण्याची विनंती केली. तसेच, पाटील यांनाही त्या डॉक्टरांशी बोलून रुग्णाला योग्य मार्गदर्शन मिळवण्यास सांगितले.

रोहित दादांच्या सूचनेनुसार, हणमंत पाटील यांनी त्या डॉक्टर साहेबांना फोन केला. डॉक्टरांनी त्यांना काही महत्त्वपूर्ण सूचना आणि पर्याय सुचवले. त्यानंतर पाटील यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाशी (मॅनॅजमेंट) चर्चा केली. त्यांनी रोहित दादांनी पाठवल्याचे सांगितले आणि रुग्णाकडे सध्या पैसे नसल्याची आणि गरज पडल्यास दादा सरकारी मदतीसाठी नक्कीच प्रयत्न करतील, असेही स्पष्टपणे सांगितले. मात्र, सुरुवातीला हॉस्पिटल व्यवस्थापन त्यांच्या भूमिकेवर जराही नरम पडायला तयार नव्हते. त्यांची प्रतिक्रिया अत्यंत थंड आणि नकारात्मक होती.

परिस्थिती बिकट बनली होती, परंतु हणमंत पाटील यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा एकदा हॉस्पिटल प्रशासनाला विनंती करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस, जेव्हा त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाला हे सांगितले की आमदार रोहित (दादा) आर आर पाटील हे स्वतः संध्याकाळी हॉस्पिटलला भेट देण्यासाठी येणार आहेत, तेव्हा मात्र चमत्कार झाला. ज्या हॉस्पिटल व्यवस्थापनाने दुपारपासून त्यांच्या विनंतीला कोणताही प्रतिसाद दिला नव्हता, ते रोहित दादा येणार हे ऐकून सायंकाळी नऊ वाजता नरम झाले आणि त्यांनी रुग्णाकडून एकही रुपया न घेता त्याला डिस्चार्ज देण्यास होकार दिला.

या अनपेक्षित मदतीमुळे रुग्णाच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. जेव्हा त्या रुग्णाची मुलगी, पत्नी, भाऊ आणि त्यांचा भाचा हॉस्पिटलने एवढी मोठी रक्कम माफ केल्याने आनंदाश्रूंनी ओतप्रोत झाले आणि कृतज्ञतेने हणमंत पाटील यांचे आभार मानत होते, तो क्षण हणमंत पाटील यांच्यासाठीही अत्यंत भावनिक होता. त्यांनाही त्यावेळी खूप आनंद आणि अभिमान वाटला. त्या माऊलीच्या तोंडून सहज उद्गार निघाले, “आपले आबासाहेब  रोहित दादांमध्ये आहेत.” हे शब्द ऐकून हणमंत पाटील यांचे मन भरून आले.

आमदार रोहित (दादा) आर आर पाटील यांच्या या कृतीने दाखवून दिले की, राजकारणात केवळ सत्ता आणि पद महत्वाचे नसून, सामान्य माणसांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना मदत करणे हेच खरे समाजकार्य आहे. त्यांच्या एका फोनमुळे एका गरीब कुटुंबाला केवळ आर्थिक मदतच मिळाली नाही, तर त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या जीवाची काळजी दूर झाली आणि त्यांना मोठा मानसिक आधार मिळाला. रोहित दादांच्या या संवेदनशीलतेची आणि मदतीच्या वृत्तीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

अशा ताज्या आणि नवनवीन बातम्यांसाठी आमच्या माझा आवाज या न्यूज पोर्टलला फॉलो करा तसेच आमच्या सोशल मीडिया हँडल्स युट्युब, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.

 

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!