करजगी बालिका अत्याचार प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल
खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी पाठपुरावा करणार – महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर
माझा आवाज विशेष प्रतिनिधी: सांगली
सांगली, दि. ८ फेब्रुवारी (माझा आवाज) – सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात करजगी येथे घडलेल्या अत्याचार व हत्येच्या गंभीर प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची कठोर शिक्षा मिळावी यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी पोलीस स्थानक, उमदी येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. तसेच, पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व मनोधैर्य योजनेतून कुटुंबास आर्थिक मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
तपास जलद गतीने पूर्ण करून कडक शिक्षा मिळवणार
बैठकीत बोलताना चाकणकर म्हणाल्या, “ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, राज्य सरकार आणि महिला आयोग या प्रकरणात जलदगतीने न्याय मिळावा यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहेत. पंधरा दिवसांत दोषारोपपत्र दाखल करून खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी महिला आयोग सरकारदरबारी जोरदार पाठपुरावा करेल.”
अधिकारी, लोकप्रतिनिधींची उपस्थिती
या बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर, जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव, प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेंद्र बेंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी शकुंतला निकम, तसेच जिल्हा चाईल्ड लाईन कक्षाच्या समन्वयक आदी उपस्थित होते
घटनास्थळी भेट देऊन तपास प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर चाकणकर यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना धीर देत, त्यांच्यासाठी न्याय मिळवण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘माझा आवाज’ न्यूज पोर्टलला फॉलो करा आणि आमच्या सोशल मीडिया हँडल्सला भेट द्या.









