केज तालुक्यातील सरपंच हत्याकांड: धनंजय मुंडे राजीनामा देण्याची शक्यता?; तपासात धक्कादायक पुरावे उघड
मुंबई, ०६ जानेवारी २०२५
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात नवनवीन वळणे उलगडत आहेत. पोलिसांनी आरोपींच्या जप्त मोबाईल डाटा रिकव्हर करण्यात यश मिळवले असून, त्या डाटामधून काही धक्कादायक व्हिडिओ आणि पुरावे समोर आले आहेत.
दरम्यान, आज सकाळपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा अजित पवार यांच्याकडे सुपूर्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र खुद्द धनंजय मुंडे यांनी राजीनाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले असून अद्याप अजितदादांनी त्यांच्या राजीनामाबद्दल कोणताही निर्णय घेतला नसल्याचे ही समजते आहे. राज्यभर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत दबाव वाढत असताना आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आणि आमदारांनी राज्यपाल या महोदयांची राजीनामा प्रकरणावर नुकतीच भेट घेतली असल्याने या विषयाला महत्त्व प्राप्त झाले असून धनंजय मुंडे राजीनामा देणार की नाही याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभर उभ्या राहिलेल्या सर्वपक्षीय आंदोलनांमुळे आणि दररोज होणाऱ्या नव्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला आहे. वाल्मिक कराड या निकटवर्तीयावर झालेल्या गंभीर आरोपांनी राजकीय परिस्थिती अधिकच चिघळली आहे.
देशमुख कुटुंबीयांच्या न्याय मागण्या, तसेच आंदोलकांनी मांडलेल्या मागण्यांवर आता सकारात्मक हालचाली होताना दिसत आहेत. मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे देशमुख कुटुंबीयांना आणि या प्रकरणात न्यायासाठी लढणाऱ्या सर्व घटकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अधिकृत, ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ‘माझा आवाज’ न्यूज पोर्टलला फॉलो करा. आमच्या सोशल मीडिया हँडल्सवर देखील जॉइन व्हा आणि प्रत्येक अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवा.









