महाविकास आघाडीचा प्रखर निषेध मोर्चा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वक्तव्याविरोधात तीव्र मोर्चा.
माझा आवाज विशेष प्रतिनिधी
नागपूर, 19 डिसेंबर 2024
केंद्रीय मंत्री मा. अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याविरोधात महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकत्र येत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), आणि काँग्रेसने या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथील विधानभवनाबाहेर प्रचंड निषेध मोर्चा काढला.
या मोर्चामध्ये सर्वच विरोधी पक्षाच्या आमदारांनी पुढाकार घेतला. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारताचेच नव्हे तर जगाचे आदर्श आहेत. त्यांच्या योगदानाचा अपमान हा आम्ही सहन करणार नाही. अमित शहा यांनी तत्काळ माफी मागावी, अन्यथा देशभरात तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असे सर्व आमदार महोदयांनी ठामपणे सांगितले.
शिवसेनेच्या नेते आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड, रोहित आर आर पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विश्वजीत कदम यांनीही या आंदोलनात भाग घेतला आणि एकमुखाने आवाज उठवला. मोर्चादरम्यान “आंबेडकर… आंबेडकर…” अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वांचे पालन करून देशाला एकत्र आणण्याची गरज अधोरेखित केली. “या देशाचे संविधान आणि न्याय प्रणाली डॉ. आंबेडकर यांनी दिलेली आहे. त्यांचा अपमान हा भारतीय लोकशाहीचा अपमान आहे,” असे सूतोवाच केले.
माझा आवाज आपल्या वाचकांसाठी महत्त्वाच्या घडामोडींचे वार्तांकन करत राहील. अशा ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी माझा आवाज न्यूज पोर्टल आणि सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा.









