‘शक्तिपीठ महामार्ग’ रद्दसाठी मणेराजुरीत चक्काजाम आंदोलन
पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट; राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची कोंडी
माझा आवाज तासगाव (प्रतिनिधी):
दि. १७ डिसेंबर २०२४: शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी मणेराजुरी (ता. तासगाव) येथे शेतकरी कामगार पक्ष आणि महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सुमारे एक तास चाललेल्या या आंदोलनामुळे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाल्याचे पाहायला मिळाले.
शक्तिपीठ महामार्गाच्या नियोजनामुळे शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी बाधित होणार असून, द्राक्ष, ऊस, डाळिंब आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. नव्याने होऊ घातलेला हा महामार्ग रत्नागिरी-नागपूर महामार्ग क्र. १६६ ला समांतर आहे. अशा वेळी नवीन महामार्गाचे आयोजन का केले जात आहे? असा प्रश्न आंदोलक शेतकरी उपस्थित करत आहेत.
आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाचे नेते दिगंबर कांबळे यांनी सांगितले की, “महामार्गामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना जमिनी गमवाव्या लागतील व काही गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. शासनाला या संभाव्य नुकसानाची जाणीव करून देण्यासाठीच हे आंदोलन आहे.” जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.
पोलिसांचा हस्तक्षेप आणि आंदोलनाचा समारोप
आंदोलकांना रस्त्यावरून हटवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. यावेळी दिगंबर कांबळे, शरद पवार, घनःश्याम नलवडे, भूषण गुरव, राहुल जमदाडे, विष्णू सावंत, एकनाथ कोळी, सनी करीम यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
वाहनांच्या रांगा; जनजीवन विस्कळीत
सुमारे एक तास वाहतूक ठप्प असल्याने महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पोलिसांना मोठा वेळ आणि मेहनत घ्यावी लागली.
शेतकऱ्यांची ठाम भूमिका:
शेतकऱ्यांच्या मते, महामार्गाचा नवीन पर्याय शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा असून, शासनाने तत्काळ हा प्रकल्प रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.
या आणि अशा ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी माझा आवाज ला फॉलो करा आणि आमच्या इतर सोशल मिडिया चॅनेल्सना फॉलो करा.









