Home » Uncategorized » शरद पवार: परिवर्तनाचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचा शिलेदार

शरद पवार: परिवर्तनाचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचा शिलेदार

Facebook
X
WhatsApp
Telegram

शरद पवार: एक प्रगल्भ राजकीय नेतृत्व आणि महाराष्ट्राचा धगधगता राजकीय आणि सामाजिक इतिहास

आज (१२ डिसेंबर) शरद पवार साहेबांचा वाढदिवस महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आणि औद्योगिक इतिहासात शरद पवार हे नाव एक अढळ स्थान घेऊन आहे. साहेबांची ६ दशकांहून अधिक काळाची कारकीर्द ही केवळ एका नेत्याची यशोगाथा नसून, ती महाराष्ट्राच्या बदलत्या प्रवासाची साक्ष देणारी आहे. साहेबांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची मुत्सद्दी रणनीती, आणि समाजाशी जोडलेली अतूट नाळ यामुळे ते केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या राजकारणातही वेगळे स्थान टिकवून आहेत.

महाराष्ट्राचे नेतृत्व

शरद पवार यांचे नेतृत्व हे फक्त राजकीय चालींनी मर्यादित नाही; ते एक दूरदर्शी विचार करणारे नेते आहेत. गावपातळीवरील कार्यकर्त्यांपासून ते देशातील प्रमुख उद्योगपतींपर्यंत सर्वांशी त्यांचे नाते आहे. रतन टाटा, राहुल बजाज, मुकेश अंबानी, अनिल अंबानी यांच्यासोबत असलेली त्यांची मैत्री केवळ व्यवसायाच्या फायद्यासाठी नसून ती महाराष्ट्रातील औद्योगिक प्रगतीचा पाया रचणारी ठरली आहे. साहित्य, नाट्य, आणि क्रीडा क्षेत्रातही पवार साहेबांचे योगदान लक्षणीय आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच अनेक सांस्कृतिक केंद्रे आणि कार्यक्रम महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात भर घालणारे ठरले आहेत.

माणसांना जोडण्याची कला

साहेबांच्या यशामागील सर्वांत मोठा गुण म्हणजे माणसं जोडण्याची आणि ती ओळखून पुढे नेण्याची कला. ते एकदा ज्या व्यक्तीला भेटतात, तिचं नाव आणि ओळख ते कायम लक्षात ठेवतात. खेड्या-पाड्यातील सामान्य कार्यकर्त्यांपासून ते साहित्य, कला, आणि राजकारणातील दिग्गजांपर्यंत साहेबांनी प्रत्येकाला त्यांच्या कर्तृत्वाने प्रभावित केलं आहे. सभेत हजर असलेल्या व्यक्तींना नावाने हाक मारून त्यांना आत्मीयतेची भावना देणारे शरद पवार साहेब कार्यकर्त्यांशी असलेल्या त्यांच्या नात्याची जाणीव करून देतात.

शांत, पण प्रभावी रणनीतीकार

राजकारणातील कोणतीही परिस्थिती असो, साहेब शांत राहून ती हाताळतात. राज्यात चार वेळा मुख्यमंत्री होताना त्यांनी दाखवलेली मुत्सद्दी कौशल्ये असोत किंवा मराठवाडा विद्यापीठ नामांतर आणि महीला विषयक धोरण राबवण्याचा धाडसी निर्णय, शरद पवार हे नाव नेहमीच दूरदृष्टीचा परिचय देत राहिले आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व इतकं गूढ आहे की ते पुढे काय करतील, याचा अंदाज सहकाऱ्यांनाही येत नाही.

कला, क्रीडा, आणि साहित्य यांना दिलेली दिशा

शरद पवार हे केवळ राजकीय नेते नाहीत, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संपत्तीचे संवर्धकही आहेत. त्यांनी नाट्य, साहित्य, आणि क्रीडा क्षेत्राला मोठं व्यासपीठ दिलं आहे. क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी राहून त्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्रात नवी दिशा निर्माण केली. त्यांच्या वैयक्तिक पुस्तकसंग्रहात नवनवीन पुस्तकं असतात. मुंबईतील पु. ल. देशपांडे भवन उभारण्यात आणि यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना देण्यात साहेबांचा वाटा मोठा आहे.

महाराष्ट्राचा संपूर्ण राजकीय इतिहास शरद पवारांशिवाय अपूर्ण

शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, आणि सांस्कृतिक इतिहासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. त्यांचं जीवनकार्य आणि नेतृत्वगुण हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून, देशाच्या राजकारणातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. साहेबांचा संयम, दूरदृष्टी, आणि माणसांशी असलेलं नातं या सर्व गुणांचा महाराष्ट्राला अभिमान आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, महाराष्ट्र त्यांच्या कर्तृत्वाला वंदन करत राहील.

– माझा आवाज’ न्यूज पोर्टल

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!