माझा आवाज विशेष रिपोर्ट –
मुंबई: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आमदार रोहित (दादा) पाटील यांनी त्यांच्या पहिल्या भाषणाने सभागृह गाजवले. रोहित पाटील, ज्यांना “ज्युनिअर आर.आर.” म्हणून संबोधले जाते, यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत आपल्या भाषणाची रंग वाढवली. आ. रोहीत आर आर पाटील हे विधानसभा अध्यक्ष यांच्या निवडीच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलत होते.
“अमृताहुनी गोड नाम तुझे देवा” या ओळीचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. अभंगातील “अमृता” आणि “देवेंद्र” या नावांचा योगायोग सभागृहातील हास्याला निमित्त ठरला. विरोधी पक्षातील आमदारांकडेही विशेष लक्ष देण्याची विनंती करताना वरील अभंगाच्या संयोगाने सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेले.
आमदार रोहित पाटील यांनी त्यांच्या भाषणात युवकांच्या भविष्याबद्दल आपली कळकळ व्यक्त केली. नवमहाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी सखोल विचार मांडले आणि इतर महत्त्वाच्या विषयांवरही प्रकाश टाकला. त्यांच्या प्रगल्भतेने आणि आत्मविश्वासाने मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेते – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – देखील भारावून गेले.
युवकांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या या भाषणामुळे आमदार रोहित पाटील हे नव्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून उभे राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वाने आणि दृष्टीकोनाने विधानभवनात एक नवा आत्मविश्वास संचारला आहे.
संताच्या आणि त्यांच्या अभंगाच्या प्रेरणेपासून नवमहाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न मांडणाऱ्या रोहित पाटील यांच्या भाषणाचे अनेकांनी कौतुक केले. आमदार रोहित पाटील यांचे हे पहिलेच भाषण असले, तरी त्याच्या परिणामकारकतेने आणि सादरीकरणाने त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे.
– “युवा नेत्यांचे हे प्रगल्भ विचार महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय लिहतील” अश्या अनेक मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्या.
(रिपोर्ट: माझा आवाज)
आमदार रोहित दादा पाटील यांचे भाषण …. जसे आहे तसे
अध्यक्ष महोदय,
मी आज आपल अभिनंदनाच्या ठराव वरती बोलत असताना आपलं मनापासून अभिनंदन करतो!!!
आज या देशाचे वेगळेपण टिकून आहे त्याचं कारण असं आहे… की अनेक शाह्या या देशाने बघितल्या पण लोकशाही अत्यंत महत्त्वाची शाही या देशाच्या वाट्याला आली.
आणि संबंध जगामध्ये आपला देश स्वतःचे वेगळेपण टिकवू शकला, वेगळं पण निर्माण करू शकला.
त्याच दुसरही कारण असं आहे की संसदीय पद्धती जी आपण कमावली त्या संसदीय पद्धतीमुळे आपल्या लोकशाहीला एक वेगळे महत्त्व निर्माण झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो एक मताचा अधिकार आपल्याला सर्वांना दिला. त्या एक मताच्या माध्यमातून आपण जो अधिकार आपल्याला मिळाला त्याच्या माध्यमातुन इथ सर्व सन्माननीय सदस्य बसलेले आहेत.
अध्यक्ष महोदय मी आपल अभिनंदन करत असताना आपल्याला विनंती करेन की आपण जसा सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान पटकावलेला आहे तसा मी सुद्धा सर्वात तरुण सदस्य म्हणून या विधिमंडळामध्ये बसण्याचा मान पटकावलेला आहे. त्यामुळे तरुण अध्यक्ष म्हणून तुमचं सर्वात तरुण विधिमंडळाच्या सदस्याकडे बारीक पणाने लक्ष असेल अशी विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी करतो.
त्याचबरोबर अध्यक्ष महोदय… तुमच लक्ष माझ्याकडे असाव याचं दुसरं कारण असं आहे की आपण सुद्धा एक निष्णात वकील आहात. मी सुद्धा वकिली पूर्ण करतोय.
एक नंबर बाकावरती बसलेल्या वकिलांकडे जसं तुमचं लक्ष असतं तसं याही वकिलाकडे लक्ष असू दे, अशी सुद्धा विनंती अध्यक्ष महोदय मी आपल्याला करतो.
अगदी या सदनाचा आपण इतिहास बघितला तर स्वर्गीय मावळणकर साहेब असतील यांनी १९३७ साली पहिल्यांदा अध्यक्षपद भूषवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी चांगलं काम केलं म्हणून लोकसभेचे अध्यक्ष पद भूषविण्याची संधी सुद्धा त्यांना मिळाली. पण आपण सर्वात चांगलं काम गेल्या पाच वर्षांमध्ये, गेल्या अडीच वर्षांमध्ये केलेल आम्ही सर्वांनी बघितलं…. त्यामुळे परंपरेप्रमाणे, फडणवीस साहेब…. आपण सुद्धा अध्यक्ष महोदयांना दिल्लीला पाठवायला काही हरकत नव्हती. अशी सुद्धा विनंती… मी आज या ठिकाणी करतो.
मी अध्यक्ष महोदय आपल्याला एक सांगेन, की या सदनाची गरिमा राखत असताना, अनेक मोठी नाव या सदनामध्ये घडली. खूप मोठी परंपरा या सदनाने निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
अन तशा काळामध्ये, आपली कारकीर्द जर बघितली तर आपण चांगलं काम आतापर्यंत सदस्य म्हणून केलेलंच आहे पण या पुढच्या काळामध्ये सुद्धा विरोधी पक्षावरती आपलं लक्ष असेल. विरोधी पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हिताच्या ज्या मागण्या येतील त्या मागण्या आपण मान्य कराल, पूर्ण कराल.
आमच्या मागण्या लक्षामध्ये घेत आपण आम्हाला सुद्धा न्याय द्याल अशी विनंती मी सुद्धा या ठिकाणी करतो.
हंगामी अध्यक्ष म्हणून कोळंबकर साहेबांनी काल-परवा आमच्या सर्वांची शपथ घेतली. मी साहेबांचे मनापासून आभार मानतो की माझ्या आयुष्यातली सर्वात प्रथम आमदारकीची शपथ मला त्यांच्या माध्यमातून घ्यायला मिळाली त्याबद्दल सुद्धा मी साहेबांचं मनापासून आभार मानतो.
आदरणीय फडणवीस साहेबांच सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. फडणवीस साहेब…. संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलेला आहे की… “अमृताहुनी गोड तुझे नाम देवा” आता संतांच्या वाणीतून सुद्धा आपलं नाव इतक्या गोड पद्धतीने घेतले गेलेल आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला गोड पद्धतीची वागणूकच द्याल अशी विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी आपल्याला करतो. आणि फडणवीस साहेब अमृताहुनी गोड मी मुद्दामच म्हणलं. कारण पुराणामध्ये सुद्धा अमृताला एक वेगळं महत्व होत आणि आजही आहे.
अगदी मी आपल्याला फडणवीस साहेब विनंती करेन की विरोधी पक्षाला सुद्धा आपण सहकार्य कराल.
आदरणीय शिंदे साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील आणि सन्माननीय सदस्य असतील यांचे सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि येत्या काळामध्ये अध्यक्ष महाराज माझे आपल्याला विनंती असणार आहे की अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर वेगवेगळ्या ज्या समित्या गठीत होतात त्या समित्यांच्या माध्यमातून चांगलं कामकाज या सदनामध्ये व्हाव अशी सुद्धा विनंती मी आपल्याला करतो. कारण अनेक आमदारांकडून, अनेक सदस्यांकडून असं आम्हाला ऐकायला मिळालं की जी आश्वासने अधिवेशनाच्या दरम्यान दिली गेली त्या आश्वासनांची पूर्तता होत नाही. त्यामळे आश्वासन समिती असेल किंवा इतर समित्या असतील याचे सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने वचक त्यावरती ठेवावा आणि त्या माध्यमातून सन्माननीय सदस्यांना न्याय देण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी.
चांगले कायदे या साधनांमध्ये तयार व्हावेत, एक तरुण म्हणून माझी अपेक्षा असणार आहे, की तरुणांना अभिप्रेत असलेला हा राज्य उद्या नव महाराष्ट्र म्हणून घडत असताना आपण उद्याच्या राज्याला अभिप्रेत असलेले आणि एकविसाव्या शतकाला अभिप्रेत असलेले कायदेच या विधिमंडळामध्ये तयार व्हावेत आणि या सर्व पुढच्या पिढीला न्याय देण्याची भूमिका या विधिमंडळाने घ्यावी एवढीच विनंती मी आपल्या सर्वांसमोर आज या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा अध्यक्ष महोदय मी मनापासून आपल अभिनंदन करतो.









