माझा आवाज प्रतिनिधी:
महाराष्ट्राच्या राजकारणात 1990 च्या दशकाने तरुण, कर्तृत्ववान नेतृत्वाला भरभरून संधी दिली होती. याच काळात दोन तेजस्वी युवा नेते, मा. आर. आर. (आबा) पाटील आणि अनिल भाऊ बाबर यांनी विधानसभेमध्ये आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला होता. त्यांच्या दूरदृष्टी, प्रामाणिकता, आणि लोकोपयोगी योजनांमुळे ते जनतेच्या हृदयात घर करू शकले. आज, तब्बल तीन दशकांनंतर, या दोन नेत्यांच्या वारसदारांनी त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत महाराष्ट्र विधानभवनामध्ये पदार्पण केले आहे.
रोहित आर. आर. पाटील आणि सुहास भैया बाबर यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत दैदीप्यमान विजय मिळवत महाराष्ट्राच्या राजकारणात नवी दिशा दाखवण्याचा संकल्प केला आहे. या दोघांनी आपल्या वडिलांच्या परंपरेला पुढे नेण्याचा निर्धार करत, त्यांच्या विचारांची सांगड आधुनिक काळाच्या गरजांशी घातली आहे.
स्व. आर. आर. (आबा) पाटील यांनी राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची अंमलबजावणी करून ग्रामीण भागाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी डान्सबार बंदी लागू करत महिलांच्या सन्मानासाठी आणि समाजात नैतिकता प्रस्थापित करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले. महात्मा गांधी तंटामुक्त योजना राबवून त्यांनी गावांमध्ये शांतता आणि सौहार्द टिकवण्याचा आदर्श ठेवला. त्यांच्या या क्रांतिकारी योजनांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मोठा बदल घडवून आणला.
स्व. अनिल भाऊ बाबर यांनी पाणी योजनांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागांमध्ये दिलासा मिळवून दिला. आटपाडी आणि खानापूरसारख्या दुष्काळी माळावर त्यांनी अथक परिश्रम घेत पाणी पोहोचवले. टेंभू योजनेच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी झटत महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात स्थैर्य आले. त्यांच्या दूरदृष्टी आणि कष्टांमुळे अनेक गावांना नवीन जीवन मिळाले.
रोहित पाटील आणि सुहास बाबर यांचे विधानभवनातील आगमन म्हणजे तरुण नेतृत्वाला चालना देणारा क्षण आहे. आपल्या पित्यांच्या आदर्शांवर चालत, त्यांनी समाजसेवेचा वसा घेतला आहे. विधानसभेत त्यांचा उत्साह आणि नव्या धोरणांसाठीचा दृष्टिकोन नक्कीच महाराष्ट्राला पुढे नेईल.
या दोघांची जोडी पाहून विधानभवनातील ज्येष्ठ आमदारांना स्वर्गीय आर. आर. (आबा) पाटील आणि स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. त्यांच्या स्मृतींना आदरांजली म्हणून, आजच्या तरुण नेत्यांनी समाजातील शेवटच्या माणसासाठी काम करत ठेवलेला वसा पुढे नेण्याची गरज आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पाटील आणि बाबर कुटुंबीयांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या वारसदारांनी हा वारसा पुढे नेण्यासाठी घेतलेला संकल्प निश्चितच प्रेरणादायी आहे. ‘माझा आवाज’ परिवाराकडून रोहित पाटील आणि सुहास बाबर यांना पुढील राजकीय प्रवासासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
(खालील फोटो: रोहित पाटील आणि सुहास बाबर यांचा विधानभवनामध्ये प्रवेश करतानाचा क्षण)










One Comment
Aaa