पंढरपूरातील शाळेत मुख्याध्यापकपदावर जातीयतेचे विखारी राजकारण
पंढरपूर, दि. २७ जानेवारी २०२५ (माझा आवाज प्रतिनिधी)
शिक्षण क्षेत्रात सामाजिक समतेचे संदेश दिले जात असताना, सोलापूर जिल्ह्यात आणि पंढरपूर तालुक्यातील गार्डी येथील विद्या मंदिर हायस्कूलमध्ये घडलेली एक घटना शिक्षणव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. या शाळेतील नव्या मुख्याध्यापक पदासाठी पात्र असलेल्या दलित समाजाच्या रावसाहेब महादेव साठे यांना, जातीयतेच्या विखारी मानसिकतेमुळे अपमानास्पद वागणूक देण्यात आली. संस्थाचालकांच्या सुनबाई राणी गायकवाड यांनी सार्वजनिकरित्या साठे गुरुजींना पदभार स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यांच्या जातिवाचक टिप्पणींनी शिक्षण क्षेत्र हादरून गेले आहे.
साठे गुरुजी हे गेल्या २३ वर्षांपासून गुणवत्तापूर्ण सेवा देत असून, पदोन्नतीनुसार त्यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, गायकवाड यांनी न्यायालयीन आदेश आणि शासन निर्णय धुडकावून, “या खुर्चीवर हलक्या जातीचा माणूस बसल्यास शाळेची प्रतिष्ठा कमी होईल,” असे वक्तव्य केले.
पोलिसांची बोटचेपी भूमिका
साठे गुरुजींनी या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, स्थानिक राजकीय दबावामुळे पोलिसांनी फक्त एनसीआर दाखल करून, प्रकरण थंड बस्त्यात टाकले. यामुळे, शिक्षण क्षेत्रातील अन्यायाविरोधातील लढाई अधिक कठीण बनली आहे.
सामाजिक न्यायासाठी शिक्षणमंत्री लक्ष देतील का?
ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, शिक्षणमंत्री आणि राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून साठे गुरुजींना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
‘माझा आवाज’साठी सामाजिक मुद्दे महत्त्वाचे
शैक्षणिक क्षेत्रातील अशा घटनांमुळे सामाजिक समतेची मूल्ये संकटात येत आहेत. अशा अन्यायाविरोधात एकत्रितपणे आवाज उठविणे अत्यावश्यक आहे.
ताज्या घडामोडी, न्याय मिळविण्यासाठी लढा आणि सामाजिक प्रश्नांवरील सखोल बातम्या वाचण्यासाठी ‘माझा आवाज’ न्यूज पोर्टलला नियमितपणे भेट द्या. तसेच, आमच्या सोशल मीडिया हँडल्सना फॉलो करून अपडेट्स मिळवा.









